पिंपरी : राज्यभरातील पोलिसांपाठोपाठपिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहर पोलीस आयुक्तालयांर्गत कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २०) दुपारपर्यंत शहर पोलीस दलात कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या सहा झाली आहे.देशभरात पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात एकही पोलिसाला कोरोनाची बाधा झाली नव्हती. मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काही खासगी रुग्णालयांमध्ये पोलिसांसाठी कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार आजारी असलेले पोलीस तसेच ज्यांना तपासणी करून घ्यायची आहे, अशा पोलिसांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. यात चाचणी घेण्यात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (दि. १५) निष्पन्न झाले होते. त्यानंतर एका सहायक पोलीस निरीक्षकाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट सोमवारी (दि. १८) पॉझिटिव्ह आले. तसेच बुधवारी (दि. २०) एका पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या सहा झाली आहे. या संख्येत वाढ होत असल्याने शहर पोलीस दलात चिंता आहे.
Corona virus : चिंताजनक! पिंपरी-चिंचवडला पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 4:05 PM
कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहर पोलीस दलात चिंता..
ठळक मुद्देपिंपरी शहरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या झाली सहा