विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजना यांमुळे गेल्या 15 दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी पहाटे अहवाल आले असून आज आणखी एकदा दुसऱ्यांदा तपासणी साठी घशातील द्रव्याचे नमुने पाठविणार आहेत. त्यानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.
चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर देशात ही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी -चिंचवड शहरात बारा मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यांनतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक उपाययोजना केल्या. वैदकीय आणि आरोग्य विभागाचे नियोजन केले. परदेशातून येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांवर नजर ठेवली होती. नागरिकांना होम क्वॉरंटाईन केले होते. त्यांच्यावर 112 टीम लक्ष ठेवून आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज एकुण १४१ व्यक्तींचे घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी १३४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.पिंपरी चिंचवड मध्ये पहिले 3 रुग्ण 11 मार्चला आढळून।आले होते. या तिघांनी पुण्यातील दुबईला गेलेल्या दाम्पत्याबरोबर प्रवास केला होतो. एकाच दिवशी 3 रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती.
आज अखेर एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १२ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. यातील 3 रुग्णाचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते त्याचे अहवाल आज पहाटे आले ते कोरोना निगेटिव्ह आहेत. आज पुन्हा एकदा त्याचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात येणार आहेत. ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ही मोठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे रुग्णाची संख्या घटून 9 होणार आहे. मात्र त्यासाठी आजच्या अहवालाची वाट पहावी लागणार आहे.
सहा दिवसातएकही रुग्ण नाहीसहा दिवसात एकही कोरोना चा रुग्ण पिंपरी चिंचवड मध्ये सापडलेला नाही. यामुळेच पिपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "12 पैकी 3 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी एकदा घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ही बाब दिलासादायक ठरणार आहे. शहरात 11 मार्चला कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. वायसीएम, भोसरीतील महापालिका रुग्णालयात कोरोना साठी कक्ष निर्माण केला. तसेच नागरिकांना या साथीच्या आजाराचे गांभीर्य समजावं यासाठी शहरात प्रबोधन फ्लेक्स लावले. तसेच 15 लाख पत्रकाचे वाटप केले. तसेच पहिल्या टप्प्यात आढळलेल्या संशयितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली, नागरिकांना होम कोराटईन केले. वेळीच उपाययोजना केल्या मुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यात काहीप्रमाणात यश आले आहे. मात्र धोका कमी झालेला नाही. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच हँड वॉश करावा, सामाजिक संपर्क टाळावा.