पिंपरी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजना यामुळे गेल्या 18 दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी घरी सोडले होते. त्यानंतर उर्वरित 9 पैकी 5 जणांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने रविवारी आज त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर 8 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर देशात ही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी -चिंचवड शहरात बारा मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यांनतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक उपाययोजना केल्या. वैदकीय आणि आरोग्य विभागाचे नियोजन केले. परदेशातून येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांवर नजर ठेवली होती. नागरिकांना होम क्वॉरताईन केले होते. त्यांच्यावर 112 टीम लक्ष ठेवून आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये पहिले 3 रुग्ण 11 मार्चला आढळून आले होते. या तिघांनी पुण्यातील दुबईला गेलेल्या दाम्पत्याबरोबर प्रवास केला होतो. एकाच दिवशी 3 रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. उपचारानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडले होते. त्यामुळे रुग्ण संख्या 9 झाली होती. त्यापैकी 5 जणांचे दोन तपासणी अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याने आज त्यांना घरी साेडण्यात आले. ही मोठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे रुग्णाची संख्या घटून 4 झाली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "12 पैकी 3 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी घरी सोडले होते. त्यानंतर आणखी 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यांना रविवारी घरी सोडण्यात येईल ही बाब दिलासादायक ठरणार आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच हँड वॉश करावा, सामाजिक संपर्क टाळावा.