पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकूण ६५ व्यक्तीचे घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ९ जणांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह आले असून ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित ११ जणांचे अहवाल उद्यापर्यंत येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या आस्थापनांना शासनाचे सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक करणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. करोना आजाराची लक्षणे दिसून आल्यास नागरीकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती व नविन भोसरी रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘एकुण ६५ व्यक्तीचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहे. उपचारार्थ दाखल ०९ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. इतर ११ व्यक्तींचा करोना करीता घश्यातील द्रावाचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.’’
याशिवाय, "आज नऊ जणांचे अहवाल आले. त्यात ०८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आलेला आहे. या सर्व व्यक्ती दि. ०६ ते ०९ मार्च या कालखंडात दुबई व जपान येथे प्रवास करुन आलेले होते. त्यांना लक्षणे आढळल्यामुळे त्यांची तपासणी केली होती. ०९ रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व इतरांची माहिती घेऊन त्यांनाही होम क्वॉरटाईनमध्ये ठेवले आहे", असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
याचबरोबर, रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत ३७ जलद प्रतिसाद चमु तयार केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फेत सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व मनपा दवाखाना रुग्णालय प्रमुखांना त्यांचेकडे परदेशातून आलेले नागरिक तपासणी करीता येत असल्यास माहिती कळविण्याची सूचना केली आहे, असेही श्रावण हर्डीकर म्हणाले.