पुणे/पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर खबरदारी घेत असताना, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. सोशल मीडियातून कोरोनाचे विनोद सुरु झालेले आहेत. सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियात असाच पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औैषध फवारणीचा एक फेक मेसेज फिरवला जात असून, पोलिसांत याबाबत तक्रार देण्यात आली आहे.पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पिंपरीचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियावर टाकला गेलेला मेसेज चुकीचा व खोटा आहे, असे महापालिका आयुक्त कार्यालयाने कळविले आहे़ सोशल मीडियावर शुक्रवारी दिवसभर आयुक्तांच्या नावाने मेसेज पसरविला जात होता़ यामध्ये आज रात्री १० नंतर उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये, या काळात कोव्हीड-०१ कीलच्या मृत्यूसाठी हवेत औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. असाच मेसेज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने फिरत असल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनात आले. त्यानंतर आयुक्तांनी खात्री करून पोलिसांत तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव होत असून, रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे. कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक फेक संदेश पसरत असून, शुक्रवारी सायंकाळी पिपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने हा संदेश पसरविला गेला.याबाबत श्रावण हार्डिकर म्हणाले, ‘असा कोणताही संदेश मी पोस्ट केला नाही, हा संदेश फेक, फसवा आहे, नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. कोरोना संदर्भातील या संदेशाची माहिती पोलिसांना दिली आहे. चुकीचे संदेश पसरविण्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.'
Coronavirus : पालिका आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर फेक मेसेज, पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 11:58 PM