पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या ११६० असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचना केल्या आहे. सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून अशा १३ नागरिकांना मंगळवारी नोटीस बजावण्यात आली आहे.
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
नागरिकांनी घरी, कामाच्या ठिकाणी अथवा वाहनामधील वातानुकुलीत यंत्रणेचा वापर टाळावा. तसेच शहरात कलम १४४ लागू झाले आहे. त्यामुळे शहरातील दुकाने व अस्थापना बंद ठेवण्यात येत असून अत्यंत आवश्यक असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे. जिवनावशक वस्तू यापुढे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्याचा अनावश्यक साठा करु नये असे आवाहन ही महापौर ढोरे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांनी आपल्या कुंटुंबीयासह आपल्या शरीराच्या तापमानाची तपासणी घरातच करावी व त्याची नोंद ठेवावी. महानगरपालिकेच्या तपासणी पथकाला माहिती देवून आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
आज १० व्यक्तींना नवीन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.