तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन येथील पहिल्या कोरोना बाधित ३४ वर्षीय परिचारिकेचा फॉलोअप कोविड १९ चाचणी अहवाल तसेच शहराजवळील माळवाडी येथील दुसऱ्या ३७ वर्षीय कोरोनाबाधित परिचारिकेच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट' मधील तिचा पती व दोन मुलगे अशा तिघांचे कोरोना निदान चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत,अशी माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली. हा अहवाल मंगळवारी (दि. १२) रात्री आला. या अहवालामुळे तळेगावकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.संबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. तळेगाव स्टेशन येथून त्या कामासाठी जात असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी (दि. ४) आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ही महिला पॉझिटिव्ह आढळली. सदरच्या परिचारिकेस ७ मे रोजी औंध येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.विशेष म्हणजे कुठल्याही विशेष उपचाराशिवाय केवळ प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर परिचारिकेने कोरोनावर मात केली आहे. सध्या तरी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत कोरोनाबाधीत रुग्ण नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्राचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे.
कोरोनाबाधित परिचारिकेच्या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्हमाळवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण ८४ पैकी २२ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून ६२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे. माळवाडी येथील परिचारिकेवर पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही परिचारिका शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात सेवेत आहे.माळवाडी येथून त्या कामासाठी जात असत कुटुंबातील पती व दोन मुलगे यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांची कोरोना निदान चाचणी करून घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. माळवाडी आणि परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असून हा भाग प्रशासनाने पूर्ण सील केला आहे. त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिक आणि वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळवाडी आणि परिसरात युद्धपातळीवर घरटी सर्वे चालू आहे.