पिंपरी : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे गैरहजर असलेल्या सर्व पोलिसांना तत्काळ हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही काहीजण जाणीवपूर्वक हजर होत नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी २१ तारखेला याबाबत आदेश दिले आहेत.
डी. बी. कोकणे (निगडी), विठ्ठल भगत (पिंपरी), एस. एच. रासकर (भोसरी), रतन कांबळे (एमआयडीसी भोसरी), जगन्नाथ शिंदे (निगडी), एस. एस. जाधव (देहूरोड), नलिनी पिंपळकर (तळेगाव एमआयडीसी) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
एमआयडीसी परिसरात व शहरात गुन्हेगारी वाढल्याने १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. या आयुक्तालयाच्या आखत्यारीत ३५ लाख इतकी लोकसंख्या आहे. सुमारे ५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात आयुक्तालयाचा विस्तार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले. मात्र, पुण्याच्या तुलनेत येथे मनुष्यबळ नाही. सुरक्षेची जबाबदारी पेलण्यासाठी आयुक्तालयांतर्गत केवळ तीन हजार पोलीस सध्या तैनात आहेत. रात्र आणि दिवस पाळी, साप्ताहिक सुट्या, किरकोळ रजा, आजारपण, कार्यालयीन कामकाज करणारे, विविध पथकांमधील पोलीस वगळता प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यासाठी खूपच कमी पोलीस आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात संचारबंदी आहे. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहराच्या सीमा तसेच अंतर्गत भागात देखील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. लॉकडाऊन तसेच संचारबंदीचे उल्लंघन करून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पाच हजार जणांवर आतापर्यंत पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदी व लॉकडाऊन असल्याने जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येत आहेत. त्यामुळे गैरहजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी हजर राहण्याच्या सूचना यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील काहीजण हजर होण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.