पिंपरी : कोरोना प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यात 12 रुग्ण पिंपरी चिंचवड मध्ये आढळून आले होते. मात्र महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजना यामुळे गेल्या चार दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून अशा १३ जणांना नोटीस दिली आहे.
चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर देशात ही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी चिंचवड शहरात 12 मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यांनतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक उपाययोजना केल्या. वैदकीय आणि आरोग्य विभागाचे नियोजन केले.परदेशातून येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांवर नजर ठेवली.
1160 लोकांना केले होम क्वारंटाईन
शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या ११६० असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचना केल्या आहे. सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून अशा १३ नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
११२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज एकुण १३७ व्यक्तींचे घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी ११२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. आज अखेर एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १२ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. चार दिवसात एकही कोरोना चा रुग्ण पिंपरी चिंचवड मध्ये सापडलेला नाही. यामुळेच पिपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे.
नवीन दहा जणांचे नमुने तपासणीसाठी
शहरातील। १० व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.