पिंपरी : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला असून वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत. ‘‘कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार असून शहरात पाच संशयित रुग्णापैकी तीन जणांचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. " नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने दहशत माजविली असताना हा व्हायरस भारतात दाखल झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रातील पुण्यातही शिरकाव केला आहे. पुण्यात पाच कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, पिंपरी-चिंचवड पाच संशयित पैकी तीन रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे म्हणाले, वायसीएम मध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांचे घशातील द्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यातून दुबईला जे प्रवाशी गेले होते त्यापैकी हे प्रवाशी आहेत."
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘महापालिका हद्दीत आपत्ती व्यस्थापन सज्ज झाला आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूची माहिती देण्यासाठी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची समन्वय म्हणून नियुक्ती केली आहे. भोसरीतील रुग्णालयामध्ये ४० खाटांचे विलगीकरण शिबिर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत शंभर खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारले आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये चाळीस खाटांचे कोरोना विलगीकरण कक्ष तयार केला आहे. शहरात तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत तर पाच संशयीत रुग्ण आढळले असून त्यांना वायसीएममध्ये दाखल केले. वायसीएममध्ये महिलांसाठी पाच आणि पुरुषांसाठी पाच अशा दहा खाटा तयार आहेत. दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
प्रबोधनही सुरूमोठे चौक, प्रभाग कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, खासगी रुग्णालये अशा १६४ ठिकाणी जनजागृतीचे फलक लावले आहेत. पत्रकांचे वाटप केले आहे. पाच हजार स्टिकर्स, पोस्टर दवाखाने, खासगी रुग्णालयात चिटकविण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार 'ड्रॉप' लेनच्या माध्यमातून होतो. त्यासाठी वेळोवेळी साबनाने व्यवस्थित हात धुवावा. हस्तांदोलन, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हे उपाय केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. वैद्यकीय सल्यानुसारच मास्कचा वापर करावा. खोकला झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.