किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर किवळेतील मुकाई चौक ते रावेत भागात पावसाळ्यानंतर गेल्या महिन्यात रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण झाल्यानंतर एका इंटरनेट केबल कंपनीमार्फत आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मुख्य रस्त्याचे पुन्हा खोदकाम सुरु झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित केबल कंपनीने या भागात केबल टाकण्यासाठीचे शुल्क मार्च महिन्यात ‘ रस्ता दुरुस्ती भरपाई’ या लेखाशिर्षाखाली महापालिकेकडे भरले होते. त्यामुळे रस्ता खोदकामास सुरुवात होणार असल्याची माहिती असतानाही किवळे ते रावेत भागातील हा रस्ता डांबरीकरण केल्याने पैशाचा अपव्यय झाला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
महापालिकेकडे एका इंटरनेट कंपनीने किवळे - सांगवी बीआरटी भागातील रावेत, किवळे व पुनावळे बीआरटी भागात रस्ता खोदाईस फेब्रुवारी २०१८ मध्ये परवानगी मागितली होती. त्यानंतर संबंधित कंपनीने ५४०० मीटर डांबरी रस्ता खोदाई करण्यासाठी 5 कोटी 39 लाख ८ हजार २०० रुपये शुल्क महापालिकेच्या कोषागारात २१ मार्च २०१८ रोजी भरले होते. दरम्यान किवळेतील मुकाई चौक ते रावेत भागात उन्हाळ्यात महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्यानंतर खोदलेला रस्ता व्यवस्थित दुरुस्त न केल्याने या भागातील रस्त्यावर विविध ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले होते. तसेच रावेत गाव ते पंप हाऊस चौकापर्यंतच्या (शिंदे वस्ती वळण) खोदलेल्या भागातील रस्त्याची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली होती. याबाबत लोकमत प्रतिनिधीने पाहणी करून खड्डे मोजून छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती.
महापालिकेने पावसाळा संपल्यानंतर मुकाई चौक ते लक्ष्मीनगर कॉर्नरपर्यंतच्या बीआरटी रस्त्यावरील खड्डे बुजवत रस्त्याची दुरुस्ती केली. तसेच गेल्या महिन्यात बीआरटी रस्त्यावरील लक्ष्मीनगर कॉर्नर ते संत तुकाराम पुलाजवळच्या चौकादरम्यानचा मुख्य बीआरटी रस्ता सर्व लहान मोठे खड्डे व्यवस्थित दुरुस्ती केली. या भागातील रस्ता डांबरीकरण केला होता. रस्त्याचे डांबरीकरण व पांढरे पट्टे मारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले असून मार्च महिन्यात हाच रस्ता खोदण्यासाठी एका केबल कंपनीने शुल्क भरण्याची माहिती असतानाही रस्त्यावर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केला असल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीने शुल्क भरले असल्याने या भागातील रस्ता खोदण्यास परवानगी दिल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.४वास्तविक किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर पावसाळ्यांत पडलेलेखड्डे दुरुस्ती केले होते. तसेच संबंधित कंपनीकडून आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम होणार असल्याने डांबरीकरण काम थांबवून आॅप्टिकल फायबर केबल टाकल्यानंतर डांबरीकरण केले असते तर ते सयुक्तिक ठरले असते . मात्र तसे न झाल्याने महापालिकेकडून कामाच्या नियोजनाअभावी पैशाचा अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.किवळे-मुकाई चौक ते रावेत दरम्यानच्या बीआरटी रस्त्याच्या भागात आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी डांबरी रस्ता खोदाई करण्यासाठी महापालिकेच्या नियमानुसार संबंधित कंपनीने महापालिकेकडे आवश्यक शुल्क भरल्यानंतर रितसर परवानगी देण्यात आलेली आहे.- दीपक पाटील, उपअभियंता, महापालिका बीआरटीएस विभाग