पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांतील गुणवत्ता दर्जा वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपने महापालिका क्षेत्रातील शाळा दत्तक घेणार आहे़ महापौर, खासदार, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासह सर्व नगरसेवक या उपक्रमांत सहभागी होणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळा आहेत. त्यांचा शैक्षणिक दर्जा आणि पटसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे महापालिका शाळांतील गुणवत्ता दर्जा वाढीकडे सत्ताधाºयांनी लक्ष दिले आहे. नगरसेवक शाळा दत्तक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाची सुरुवात पिंपळेगुरव आणि वैदूवस्ती येथील महापालिकेच्या शाळेतून झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी शाळेला भेट दिली.याविषयी पवार म्हणाले, ‘‘शिक्षण मंडळ विसर्जित झाल्याने शिक्षण समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाचा कारभार चालविण्यात येणार आहे. शिक्षण समिती लवकरच कार्यान्वित होणार आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. गुणवत्ता सुधारणा हाच उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.’’
नगरसेवक घेणार शाळा दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 6:04 AM