पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काही भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्या लागेबंधामुळे व अर्थपूर्ण संबंधामुळे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून सर्वसामान्य जनतेच्या मात्र दरवेळी तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार प्रशासनाकडून केला जात आहे. भ्रष्ट ठेकेदारांना कोट्यवधींची कामे दिली जातात आणि गोरगरीब जनतेला साधी तीन हजार रुपयांची मदत फेटाळली जाते हा अन्याय आहे, भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार तुपाशी व गोरगरीब जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक तुषार कामठे यांनी आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनासमोर आंदोलन केले.
नगरसेवक तुषार कामठे यांनी 'भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट ठेकेदार, महापालिकेची तिजोरी लुटतायत वारंवार.., गोरगरीबांच्या तोंडाला पुसली पाने, भ्रष्टाचाऱ्यांचा धंदा फक्त पैसे खाणे..!, गोरगरीब जनतेला लागलीय मदतीची आस, अधिकारी ठेकेदारांना मात्र पैशांचा हव्यास..!, भ्रष्ट आणि पैसेखाऊ महापालिका कारभार.. जनता असल्या थापड्यांना माफ नाही करणार..! अशी वाक्ये लिहिलेला फलक परिधान करून महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसून आंदोलन केले.
महापालिका महासभेने कोरोनाकाळात आर्थिक अडचणीत असणाऱ्या गोरगरीब जनतेला तीन हजार रुपयांची मदत करण्याचे ठरविले असताना आयुक्तांनी विभागीय आयुक्तांच्या नावाखाली विषय फेटाळून लावला आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या माजी महापौरांशी संबंधित गॅब इंटरप्राइजेस ची विभागीय आयुक्तांकडून चौकशी चालू असताना देखील त्याच कंपनीला तब्बल पाच कोटींची कामे सहजपणे देण्यात आली.याबाबत कामठे म्हणाले, वादग्रस्त गॅब या संस्थेची यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे ऑक्सीजन गॅस प्रेशर कमी झाल्यामुळे दहा रुग्णांचे मृत्यू, कोविड काळामध्ये ऑक्सिजनची तीव्र गरज असताना देखील बाहेरच्या खाजगी हॉस्पिटल्सला ऑक्सीजन विक्री केली बाबत, मेडिकल ऑक्सिजन गॅस टँकरचे बिल महापालिकेकडून घेऊन तोच ऑक्सिजन पुन्हा गॅस सिलेंडर मध्ये भरून खाजगी रुग्णालयांना विकणे, निविदा सादर करताना एक दर देणे तसेच सहा महिन्यांमध्ये तो दर परवडत नाही म्हणून दर वाढवून घेणे अशा गंभीर आरोपांची विभागीय आयुक्तांकडे चौकशी सुरू असतानाही वादग्रस्त गॅब या संस्थेस महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय जिजामाता रुग्णालय आकुर्डी तसेच थेरगाव येथील रुग्णालयां करिता मेडिकल ऑक्सिजन गॅस पुरविण्याचे तब्बल पाच कोटींचे काम कसे दिले जाते? म्हणजेच जनतेच्या पैशांची उधळपट्टी वादग्रस्त गॅब इंटरप्राइजेस सारख्या भ्रष्ट ठेकेदारांवर करण्याचेच काम महापालिका प्रशासन करत असल्याचे दिसून येते.