पिंपरी : भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ, गतिमान, पारदर्शक कारभार आणि प्रशासनावर भर देणार आहे. काम करून देण्यासासाठी कोण लाच मागत असेल तर कोणालाही न घाबरता बिनदास्तपणे त्याची तक्रार एसीबीकडे करावी, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिका आयुक्त पदाचा पदभार हर्डीकर यांनी स्वीकारला. हर्डीकर म्हणाले, ‘‘प्रशासकीय शिस्त लावण्यात येईल. प्रशासनाने गतिमान काम केले पाहिजे. वेळेत प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. जनतेला त्याचा लवकरात लवकर उपयोग झाला पाहिजे. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. मेट्रोचेही ‘सर्व्हेक्षण’ झाले आहे. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देणार आहे. मेट्रो, बीआरटीएस, पीएमपीएमएलला महापालिकेची जी मदत लागणार आहे, ती मदत करण्यात येईल. पर्यावरणपूरक वाहतूक करण्यावर भर दिला जाईल. पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन नवीन पार्किंग पॉलिसी बनविण्यात येईल. जन संवाद साधण्यावर भर असणार आहे. नागरिकांच्या अपेक्षेपेक्षा चांगले वाटणारे, आपलेसे वाटणारे शहर बनविण्यावर भर दिला जाईल. आजी-माजी पदाधिकारी, अनुभवी नेते यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन काम करण्यात येणार आहे. ‘सारथी’ हेल्पलाईन शहराचा मानदंड आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनेक नवीन योजना सुरू केल्या होत्या. त्या पुन्हा सुरूकरण्यात येतील. कामे वेळेत झाली पाहिजे. वेळेत झाली नाहीत तर संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असणार आहे. पारदर्शक कारभार करत असताना भ्रष्टाचार नसला पाहिजे. कोणी लाच मागत असेल तर कोणालाही न घाबरता त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.’’(प्रतिनिधी)
भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर
By admin | Published: April 28, 2017 5:56 AM