देहूरोड : येथील आॅर्डनन्स फॅक्टरी (शस्त्रास्त्रनिर्मिती कारखाना) डेंजर बिल्डिंग वर्कर व परीक्षक (फिलिंग) या पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रातील स्थानिक तरुणांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. कामगार भरती प्रक्रियेत कारस्थान करून उत्तर भारतीय तरुणांना अतिशय योजनापूर्वक स्थान देण्यात आले असून, स्थानिक तरुणांचा रोजगार हिरावून घेतला असल्याची भावना फॅक्टरीतील प्रमुख चारही कामगार संघटनांनी एकत्र येऊन शनिवारी सायंकाळी प्रवेशद्वारासमोर संयुक्त कृती समितीच्या वतीने व्यक्त केली आहे. प्रशासनाने ठरवलेल्या पात्रतेचे उमेदवार राज्यात उपलब्ध नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देहूरोड येथील फॅक्टरीच्या वतीने ११ जुलै २०१५ रोजी विविध वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन विविध पदांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार ४ आॅक्टोबरला डेंजर बिल्डिंग वर्कर व परीक्षक (फिलिंग) या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. निकाल १५ आॅक्टोबरला जाहीर झाला आहे. त्यानुसार डेंजर बिल्डिंग वर्कर (डीबीडब्ल्यू) या पदासाठी १७७ व परीक्षक (फिलिंग) पदासाठी ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यांना येत्या २८ व २९ आॅक्टोबरला ट्रेड टेस्टसाठी बोलावण्यात आले आहे. या पदांसाठी झालेल्या लेखी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. (वार्ताहर)प्रश्नपत्रिका फुटली?लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच प्रसिद्ध केलेल्या यादीत एकाच भागातील नावाची संख्या अधिक असल्याचे सांगितले. या यादीत एकूण ६८ कुमार नावाचे उमेदवार असून, आठ मीना नावाचे उमेदवार असल्याचे सांगण्यात आले. भरतीची चौकशी करण्याची मागणी केली असून, खासदार श्रीरंग बारणे यांनाही याबाबत सर्व संघटनांनी निवेदन देऊन चौकशी करून राज्यातील स्थानिक तरुणांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.महाप्रबंधकांना निवेदन विकासनगर, देहूरोड येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी शनिवारी दुपारी महाप्रबंधक यान भेटून एक निवेदन दिले.
‘आॅर्डनन्स’च्या भरतीत गैरव्यवहार
By admin | Published: October 18, 2015 3:00 AM