पिंपरी : चीनमध्ये कोरोनाचे संकट पुन्हा गडद झाल्याने आपल्या देशात चिंता वाढली आहे. कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट शहरात पूर्ण झाले आहे. कोरोनाचा बूस्टर डोस दंडात टोचायली भीती वाटत असल्यास नाकातून हा डोस घेता येणार आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये ही उपलब्ध नाही. त्यासाठी खासगी रुग्णालयात ९९० रुपये मोजावे लागणार आहेत.
पिंपरी - चिंचवड शहरात एकूण लसीकरण ३५ लाख ८२ हजार ८३८ झाले आहे. पहिला डोस १८ लाख, तर दुसरा डोस १६ लाख जणांनी घेतला आहे. शहरात ९ मार्च २०२० रोजी कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. तीन लाटा येऊन गेल्या असून, शहरात लसीकरणाचा वेग चांगला आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू आहे. त्यासोबतच दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांनी कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घ्यायला हवा. तसेच बूस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांनीही डोस घेणे गरजेचे आहे.
कोविड उपचारासाठी प्रशासन सज्ज
महापालिकेच्या वतीने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाठी सज्जता ठेवली होती. तशीच सज्जता लाट आल्यास ती परतवून लावण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज आहे. पुरेशा औषधांचा साठा, लसीकरण आणि कोविड केंद्रांची सज्जताही करण्यात येणार आहे. नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनावर अजूनही औषध आलेली नाही. मात्र, त्याचा प्रतिबंध करता येतो. त्यासाठी नागरिकांनी सजग असायला हवे. काळजी घ्यायला हवी. सध्या मास्क आणि कोरोना प्रतिबंधक लस हाच उपाय आहे. तसेच घराबाहेरून घरात आल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची गरज आहे.
१८ लाख जणांनी घेतला पहिला डोस
शहराची लोकसंख्या तीस लाख असून, त्यात १८ वर्षांवरील नागरिक एकोणीस लाख आहेत. १८ लाख ९३ हजार ७२८ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.
१६ लाख जणांनी घेतला दुसरा डोस
महापालिका परिसरातील १६ लाख ८८ हजार ४१० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण महापालिकेत कमी दिसत आहे. कारण अनेकांनी पहिला डोस शहरात आणि दुसरा डोस दुसरीकडे घेतला आहे.