वडगाव मावळ : मावळ पंचायत समितीच्या नूतन इमारतीस बहुजन लोकनेत्याचे नाव द्यावे अन्यथा आचारसंहितेच्या काळात बहुमताच्या जोरावर २४ नोव्हेंबरला मंजूर केलेल्या ठरावाविरुद्ध न्यायालयीन लढा देण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे यांनी दिली आहे. महासंघाचे तालुकाध्यक्ष सोनवणे यांच्यासह बबन वंजारी, ज्ञानदेव ओव्हाळ, तुकाराम दळवी, यशवंत नाईकनवरे, संतोष लोखंडे, प्रकाश गायकवाड यांनी सभापती मंगल वाळुंजकर व गटविकास अधिकारी नीलेश काळे यांना निवेदन दिले आहे. पंचायत समितीची नूतन इमारत, प्रवेशद्वार व दालनांना लोकनेत्यांची नावे देण्याचा ठराव विरोधकांचा विरोध असताना बहुमताच्या जोरावर मंजूर केला. ठरावात लोकनेत्यांच्या नावाचा अभाव दिसून येत आहे. वास्तविक राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवाचा काळ सुरू असून, त्यांनी तालुक्यातील लोणावळा, तळेगाव, कामशेत परिसरात वास्तव्य करून राज्यघटनेची काही पाने लिहिली आहेत. पंचायत समितीच्या आवारामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा ठराव करणे आवश्यक आहे. परंतु पंचायत समितीने लोकनेत्याच्या नावामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा समावेश केलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
ठरावाविरुद्ध न्यायालयीन लढ्याचा इशारा
By admin | Published: December 23, 2016 12:25 AM