पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणात माजी खासदार प्रदीप रावत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसच्या शहर शाखेने टीका केली आहे. रावत यांनी या प्रकरणात एका संस्थेने केलेल्या अहवालाचे प्रकाशन करताना पोलीसच याला जबाबदार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने त्याचा समाचार घेतला असून, सरकारचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांना जबाबदार धरले जात असल्याचे म्हटले आहे.शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘रावत यांचा शोध चुकीचा आहे. कोणत्या तथाकथित सत्यशोधन समितीचा अहवालही सरकारला वाचवण्यासाठीच केलेला आहे. पोलिसांची यात काहीच चूक नाही, हे खरे सत्य आहे. गुप्तचर खात्याने गृह खात्याला सर्व माहिती दिली होती.त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी काळजी घेणे गरजेचे होते. पोलीस बंदोबस्त लावण्याची जबाबदारी गृह खात्याची होती. ती त्यांनी पाळली नाही. कार्यक्रमाला जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जातीयवादी शक्तींनी हल्ला केला तो सरकारने गुप्तचर खात्याच्या अहवालाकडे डोळेझाक केली म्हणून हे यातील सत्य आहे व नेमके तेच लपवले जात आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांवर खापर फोडले जात आहे तेही जातीयवादी दृष्टिकोनातूनच, असा आरोप बागवे यांनी केली. अशा प्रकरणांना जातीय रंग देऊन राजकारण साधणे, हा भाजपाचा अजेंडाच आहे. त्यांना सरळ निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे नेहमीच ते जातीयवाद पसरवून भावनेचे राजकारण करतात. इतकी मोठी घटना घडूनही गृह खाते ताब्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांना घटनास्थळी भेट द्यावी असे वाटले नाही, नक्की काय झाले याची माहिती घ्यावी वाटली नाही. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याची साधी माणुसकीही त्यांना दाखवता आलेली नाही, अशी टीका बागवे यांनी केली.
अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर खापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:48 AM