तेजस टवलारकरपिंपरी : शहरात आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. परिणामी सर्वाधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. महापालिकेने अशा रुग्णांची माहिती घेण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी कॉल सेंटर सुरू केले आहे. कॉल सेंटर चालविण्यासाठी एका खासगी संस्थेला प्रतिकॉलसाठी १३ रुपये देण्यात येतात. परंतु, प्रत्यक्षात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या बहुतेक रुग्णांना कॉल येत नसल्याची वस्तुस्थिती लोकमत पाहणीतून दिसून आली आहे. त्यामुळे रुग्णांना खरेच कॉल जातात की फक्त कागदोपत्री कॉलचे मीटर वाढविले जाते, याची पडताळणी करण्याची आवश्यकता आहे.
शहरात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या काही रुग्णांशी लोकमत प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही आठ दिवस गृहविलगीकरणात असताना कोणत्याही प्रकारचा कॉल आलेला नाही. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिवसांतून एक वेळा तरी फोन करून औषधोपचारांची माहिती घ्यावी. तसेच रुग्णांना कोणती लक्षणे आहेत. या रुग्णांशी डॉक्टरांनी संवाद साधावा, यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.
ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशाच रुग्णांना गृहविलगीकरणात उपचार दिले जात आहेत. एका रुग्णाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले, १० जानेवारीला कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिका रुग्णालयात जाऊन अहवाल घेतला. यावेळी औषधे देण्यात आली. परंतु त्यानंतर कोणताही कॉल आलेला नाही.१६ दिवसांत तब्बल ९५ हजार १२३ कॉलचा दावा...
शहरात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मागील १६ दिवसांत तब्बल ९५,१२३ फोन केले आहेत. तसेच प्रत्येक रुग्णाला दिवसातून एका वेळा तरी फोन केला जातो. गृहविलगीकरण कालावधी आठ दिवसांचा असतो. तपासणी पॉझिटिव्ह आल्यापासून आठ दिवसांपर्यंत रुग्णांची संपर्क केला जातो, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांना फोन केला जातो. कोणत्या रुग्णांना फोन करण्यात आला. त्या रुग्णांना कोणती लक्षणे आहेत, किती वाजता कॉल करण्यात आला. तसेच कोणत्या डॉक्टरने रुग्णांशी संवाद साधला, याची संपूर्ण माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. तसेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण फोन करण्याचे काम केले जात आहे. कोणत्या रुग्णाला फोन आला नसेल, तर त्यांनी माहिती द्यावी, का फोन आला नाही, याची माहिती घेण्यात येईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका