नारायण बडगुजर- पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यातही यातील गंभीर रुग्णांना फुफ्फुस तसेच हृदयाशी संबंधित आजार असतात. त्यामुळे जीवन रक्षा प्रणाली व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली 'कार्डियाक' रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र,पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या कोविड सेंटरपर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.
रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी वेटिंग लिस्ट असते. यात रुग्ण दगावण्याचेही काही प्रकार झाले. पिंपरीतील मगर स्टेडियम व चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात आले. येथे काही बेड व्हेंटिलेटरची सुविधा असलेले आहेत तर इतर सर्व बेड ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्ण किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण दाखल करून घेण्यात येत आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांतून असे रुग्ण या कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहेत. या रुग्णांना घेऊन जाण्यासाठी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या अति गंभीर रुग्णांना कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. मात्र महापालिकेकडे अशी एकही कार्डियाक रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रुग्णांना कोविडसेंटरपर्यंत कसे नेणार, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित होत आहे. महापालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे.
खासगी वाहनांचा रुग्णवाहिका म्हणून वापर करापिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडे १७९७ रुग्णवाहिकांची नोंद आहे. यातील शहरात असलेल्या रुग्णवाहिका अधिग्रहित केलेल्या असून, त्या महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने आणखी रुग्णवाहिकांची मागणी महापालिकेकडून होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका म्हणून खासगी वाहनाचा वापर करण्यास आरटीओकडून मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नऊ वाहनांना रुग्णवाहिका म्हणून परवानगी देण्यात येणार आहे.
रुग्णवाहिकांची मागणी वाढत असल्याने खासगी वाहनांचे मॉडिफिकेशन करून त्यांचा रुग्णवाहिका म्हणून वापर करता येईल, असे महापालिकेला सूचविले आहे. त्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने रुग्णवाहिकेच्या आवश्यक सुविधा या वाहनांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. त्याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा झाली आहे.- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
वायसीएम रुग्णालयाकडे १४ रुग्णवाहिका आहेत. त्यातील पाच रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होऊ शकते. मात्र कोणत्याही रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर उपलब्ध करून दिला जात नाही. त्या सुविधेबाबत विचार केला जाईल.- डॉ. राजेश वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी
कार्डियाकच्या अति गंभीर रुग्णाला यापूर्वी हलविण्याचा प्रसंग आला नाही. त्यामुळे कार्डियाक किंवा अति अद्ययावत रुग्णवाहिकेची गरज पडली नाही. महापालिकेकडे अद्याप तशी एकही रुग्णवाहिका नाही.- डॉ. पवन साळवे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका