पिंपरी : वकिलाला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी व २८ फेब्रुवारी २०२४ रोजी ही घटना घडली.
प्रज्वल उर्फ राहुल कमलेश दुबे (३०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १२) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम कांबळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुबे हे वकील आहेत. शुभम कांबळे याने त्यांना शस्त्राची भिती दाखवून त्यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे फिर्यादी दुबे यांनी सांगितले. त्यामुळे शुभम कांबळे याला राग आला. कोयत्याने आतडे बाहेर काढू का, अशी धमकी त्याने दिली. तू माझ्या साथीदारावर गुन्हा दाखल केला, काय झाले त्याचे, तू माझी तक्रार दिल्यास मी जेलमधून बाहेर आल्यावर तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. त्याबाबत दुबे यांनी कोठेही तक्रार दिली नाही. त्यानंतर शुभम याने पुन्हा २८ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास साथीदारांसह येऊन दुबे यांना जिवे मारण्याची धमकी दिली.