पिंपरी : महिला, तरुणी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. यात शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात वावरणाऱ्या तसेच रेंगाळणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. यात काही जणांना पोलिसांनी चोप देखील दिला. त्यामुळे रोडरोमिओंची चांगलीच तंतरली.
पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालय पिरसरात काही जण घुटमळतात. त्यांच्याकडून आरडाओरडा करून गोंधळ निर्माण केला जातो. तसेच महिला, तरुणी व विद्यार्थीनींना त्रास देण्याच्या उद्देशाने टवाळखोरी केली जाते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरिश माने व युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी सोमवारी टवाळखोरांवर कारवाई केली.
भोसरी, ताथवडे, काळेवाडी, चिंचवड येथील शाळा-महाविद्यालय परिसरात विनाकारण घुटमळणारे व शांतता भंग करणाऱ्या २७ मुलांवर कारवाई करण्यात आली. संबंधित शाळा व महाविद्यालय प्रशासनाला शैक्षणिक संस्थेच्या आवारात दर्शनी भागात तक्रार पेटी लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
टपऱ्यांवर कारवाईचा बडगा
यापूर्वी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील शाळा, महाविदल्यालय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या शंभरहून अधिक पानटपऱ्यांवर महापालिकेच्या विशेष पथकाच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. यात टपऱ्या जप्त केल्या. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी धसका घेतला.
''शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी, तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून तक्रारपेटी, पोलिस दीदी, दामिनी पथक, तसेच पोलिस काका ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड''