निगडी : सेल्फी काढण्याची भारी हौस असलेल्या तरुणाईला सध्या एक रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी काढण्याचे ‘याड’ लागलंय. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर सध्या १ रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी धडाधड पडत आहेत.काही दिवसांपूर्वी बँकांकडून नवीन २००, ५००, २ हजार रुपयांच्या नोटा हाती पडताच त्यासोबत सेल्फी काढून ते छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ सुरू झाली होती. सोबत देशभक्तिपर चिन्हांसह नवीन नोट खराब न करण्याची विनंती करणारे संदेश पाठवून एक चांगली सुरुवात करण्याचे आवाहनही केले जात होते. नवीन चलनावर काहीही लिहू नका, एक चांगली सुरुवात करा आणि सहकारी, मित्र, कुटुंबातील सदस्यांनादेखील ही माहिती द्या, अशी विनंती व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी माध्यमांवर करण्यात येत आहे.निगडीतील रिक्षाचालक नितीन साळवे या तरुणाच्या हातात १ रुपयाची कोरी करकरीत नोट हाती पडताच अचर्यचकीत होऊन त्या नोटेबरोबर सेल्फी घेण्याचा मोह नितीनला आवरला नाही.नवीन नोट आकर्षकअतिशय छोटी असलेली नोट सध्या तरुण व लहान मुलांना आकर्षित करत आहे. बऱ्याच दिवस एक रुपयाची नवीन नोट चलनात कधी येणार याची उत्सुकता नागरिकांत होती. त्यामुळे १ रुपयाची नोट चलनात आल्याने त्यासोबत सेल्फी काढून तो मित्रांच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर अपलोड केला. सोशल मीडियावर विनोदी संदेश मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्याचबरोबर नोट खराब न करण्याचा सामाजिक संदेशदेखील पाठविण्यात येत आहे. ही चांगली बाब असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
नोटेसोबत सेल्फीची तरुणांमध्ये क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:33 AM