भोसरी : गेल्या १५ वर्षांत एकही विकासकाम न करता अथवा विकासकामांसाठी साधा पाठपुरावा न करणारे विरोधक उमेदवार इंद्रायणीनगरमधील विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहेत. फोटो काढून आणि बॅनर लावून मते मिळत नसतात. अशाप्रकारे विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार हास्यास्पद असल्याची आरोप नगरसेवक संजय वाबळे यांनी केला. इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय वाबळे, विक्रांत लांडे, सोनाली उदावंत, सविता झोंबाडे यांनी गुरुवारी पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात केली. वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच सेक्टर १ व सेक्टर २ येथे पदयात्रा काढण्यात आली. या वेळी वाबळे बोलत होते. गेल्या पंधरा वर्षांत विरोधी उमेदवारांनी इंद्रायणीनगरच्या विकास कामांसाठी पालिकेमध्ये साधे एकही पत्र दिले नसल्याचा आरोपही वाबळे यांनी केला.विक्रांत लांडे म्हणाले, ‘‘विरोधी उमेदवारांनी जनतेसाठी एकही काम केलेले नाही. केवळ आरोप-प्रत्यारोपांमध्येच धन्यता मानणाऱ्यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.’’दरम्यान, या वेळी सोनाली उदावंत व सविता झोंबाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.दरम्यान, या पदयात्रेनंतर बालाजीनगर व गवळीमाथा येथे कोपरा सभा पार पडल्या. गुरुविहार कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारांनी त्यांची संवाद साधला, तर सिद्धी सम्राट सोसायटीमध्ये कोपरा सभा पार पडली. कोपरा सभेला नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
श्रेय लाटण्याचा प्रकार हास्यास्पद
By admin | Published: February 17, 2017 4:53 AM