पिंपरी : पवना नदीच्या निळ्या पूररेषेत बिगर परवाना राडारोडा टाकला. तसेच अनधिकृतरित्या भराव केला. कासारवाडी येथे पिंपळे गुरव पुलाजवळ १८ फेब्रुवारी २०२० रोजी हा प्रकार घडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी ५४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता राजेंद्र वसंतराव डुंबरे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जालिंदर किसन लांडे, विजया दत्तात्रय लांडे, बाळू किसन लांडे आणि सातबारा उताºयावर नावे असेलेल्या अन्य ५१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे पिंपळे गुरव पुलाजवळ पवना नदीच्या पात्रात निळ्या पुररेषेमध्ये आरोपींनी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकून भराव केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास ही बाब आली. भराव काढून घेण्याबाबत महापालिकेच्या या विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र, आरोपींनी नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला नाही. त्यामुळे महापालिकेकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार महराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९९६ चे कलम ५३ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ क २६०, २६१, २६७, आणि ४७८ नुसार आरोपी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नदीच्या निळ्या पूररेषेत राडारोडा टाकल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 4:04 PM
पवना नदीच्या पात्रात निळ्या पुररेषेमध्ये आरोपींनी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकून भराव केला.
ठळक मुद्देकासारवाडी येथे पुलाजवळ घडला होता प्रकार