पिंपरी : ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम करताना इमारतीची सीमा भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेस कारणीभुत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या ठेकेदारासह सुपरवायझरवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार संतोष हन्नु राठोड (वय ३२, रा. मोहननगर, चिंचवड) व सुपरवायझर यशोधर गावीत (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सनोज महिंद्रा ठाकुर (वय ३२, रा. गुलीस्ताननगर, मोमीन मोहल्ला, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुलीस्तानगर येथील यशवंत प्राईड सोसायटीच्या मधील बोळात ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम सुरु आहे. यशवंत प्राईड सोसायटीची संरक्षक भिंतीच्या शेजारी खोलवर खोदकाम केल्यास ही संरक्षक भिंत कोसळेल याची जाणीव असतानाही मागील दीड महिन्यांपासून हे काम सुरु आहे. कोणत्याही प्रकारच्या संरक्षक उपाययोजना याठिकाणी केल्या नाहीत. त्याकडे ठेकेदार संतोष हन्नु राठोड व सुपरवायझर यशोधर गावीत यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत कामकाज केल्याने शनिवारी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास येथील संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीखाली सापडून फियार्दी सनोज ठाकूर यांचा मुलगा लोकेश सनोज ठाकूर (वय ७) हा दाबला गेला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. तसेच याठिकाणी ड्रेनेजचे काम करणारे मजुर शिवनारायण सोरेन व विसुदेव सोरेन (दोघेही रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव, मूळ-झारखंड) हे देखील जखमी झाले. तसेच सोसायटीच्या संरक्षक भिंतीचेही नुकसान झाले. दरम्यान, भोसरी पोलिसांनी आरोपींवर ३०४, ३३७, ४२७ कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण करीत आहेत.
चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:37 IST