पिंपरी : सोनाराच्या दुकानात येऊन सोन्याच्या धातूसारखी दिसणारी अंगठी सोनाराला देऊन फसवणूक केली. त्यानंतर सोन्याच्या धातूसारखी दिसणारी चैन सोनाराला देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून ते ५ ऑगस्ट या कालावधीत चिंचवड गावातील प्रियंका ज्वेलर्स या दुकानात घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दीपककुमार हरी गुप्ता (वय ४५, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अनोळखी इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश कैलाश वर्मा (वय २८, रा. गांधीपेठ, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश वर्मा यांचे चिंचवडगावामध्ये प्रियंका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपींनी ११ जून रोजी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन सोन्याच्या दागिन्यांची मोड दिली होती. ते दागिने वितळवल्यावर त्यातील सोन्याचे वजन कमी भरले. त्यानंतर २२ जून रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन सोनेरी रंगाची दिसणारी एक अंगठी सोने आहे, असे भासवून फिर्यादी यांना दिली. त्यापोटी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ३५ हजार रुपये फसवणूक करून नेले. त्यानंतर आरोपी दीपककुमार ५ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता पुन्हा फिर्यादी यांच्या दुकानात आला. त्याने सोनेरी रंगाची चैन आणून सोन्याची आहे, असे भासवून पुन्हा फिर्यादी यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी दीपककुमार याला अटक केली आहे.