- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मुलीला चित्रपटात प्रमुख भूमिका द्या, त्यासाठीचा खर्च देऊ असे सांगून विश्वास संपादन करून करारनामा झाल्यानुसार चित्रपट निर्मितीसाठीचा ११ लाख ६० हजार रुपये खर्च दिला नाही. कागदपत्रांवर बनावट स्वाक्षऱ्या केल्याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फसवणूक केली असल्याची फिर्याद दाखल केली असल्याची माहिती चित्रपट निर्माती मंगल खाडे यांनी दिली.वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली असून, राजेंद्र गोरख भोंडवे (वय ४१, रा. रावेत), सुनंदा राजेंद्र भोंडवे (वय ३८, रा. रावेत) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निर्माती खाडे आणि भोंडवे यांनी चित्रपट निर्मितीसाठी करारनामा करून घेतला होता. या बनावट स्वाक्षरींच्या पत्रव्यवहारामुळे चित्रपट प्रदर्शन करण्यास अडचणी येत आहेत, असे खाडे यांनी सांगितले. भोंडवे यांनी विविध व्यक्तींच्या खात्यातून मंगलम पिक्चर्स या नावाने करारात ठरलेल्या २५ लाख रकमेपैकी १३ लाख ४० हजार रुपये जमा केले. उर्वरित ११ लाख ६० हजार रुपये मात्र दिले नाहीत. तसेच बनावट स्वाक्षरी वेगवेगळ्या कागदपत्रांवर केली आहे़ बनावट स्वाक्षरीने चित्रपट महामंडळाकडेही आरोपींनी पत्रव्यवहार केला आहे.