शाई फेकली म्हणून खूनाचा गुन्हा; राज्यपाल, भाजप नेत्यांवर महापुरूषांच्या अवमानाचा गुन्हा का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 08:52 AM2022-12-12T08:52:47+5:302022-12-12T08:53:28+5:30
कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही
पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, महाराष्ट्रातील महापुरूषांचे व स्त्रियांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल, भाजपचे नेत्यांवर महापुरूषांचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
अजित पवार म्हणाले, ‘‘कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही. मात्र, चळवळीतून घडलेल्या आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना शाळा बांधण्यासाठी देगणी, वर्गणी, लोक सहभागातून महापुरूषांनी निधी गोळा केला, असे म्हणता आले असते. त्यांनी खांद्यावरील रूमाल काढून त्याची झोळी करीत भीक मागण्याची कृती करून दाखविली. अपमानजनक उद्गार काढले, हे चुकीचे आहे.’’
पवार म्हणाले, शाई फेकीनंतर एका खासगी कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी ‘‘पोलिसांवर कारवाई करू नका, असे वक्तव्य केले. मात्र, काही तासांतच ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच बातमीसाठी पत्रकार प्रसिद्ध व्यक्ती, नेता, कलाकार, अभिनेता यांच्यावर कॅमेरे लावतात. हिडीओ काढतात. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे पत्रकारावरही गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आले. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याच्या घटनेचा राग येऊन ते रस्त्यावर उतरले नाहीत. निवडणुकीत विजय मिळाला म्हणून त्यांनी रस्त्यावर येऊन पेढे वाटले. भाजपची ही दुप्पटी भूमिका बरोबर नाही.’’