पिंपरी : हिंजवडी परिसरात एका प्रसिध्द डॉक्टरने १३ वर्षीय मुलीला चुकीच्या पध्दतीने इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाला, असा नातेवाइकांनी आरोप केला होता. त्यानुसार याप्रकरणी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहवालात डॉक्टर दोषी असल्याचे म्हटले आहे. प्रज्ञा अरुण बोरुडे (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार, डॉ. रामकृष्ण जाधव यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रज्ञा हिला थंडी-ताप येत असल्याने हिंजवडीतील डॉ. रामकृष्ण जाधव यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. यावेळी डॉ. जाधव यांनी तपासणी करून प्रज्ञाला उजव्या कमरेवर इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रज्ञा घरी गेली मात्र इंजेक्शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कंबरेवर आणि पाठीवर काळे चट्टे आणि फोड आल्याने तिला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते मात्र,उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी डॉ. रामकृष्ण जाधव हेच जबाबदार असून त्यांच्याविरोधात मृत मुलीचे वडील अरुण बोरुडे यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू ठेवला, मृत मुलींवर झालेल्या उपचारांची सर्व कागदपत्रे पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आली. त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात हिंजवडी पोलिसांकडे आला. यामध्ये संबंधित डॉ. जाधव यांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा करत चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने जंतूंप्रादूर्भाव होऊन मुलीचा मृत्यू झाल्याचे निष्षन्न झाले आहे.
चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 2:13 PM
हिंजवडी परिसरात एका प्रसिध्द डॉक्टरने १३ वर्षीय मुलीला चुकीच्या पध्दतीने इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाला, असा नातेवाइकांनी आरोप केला होता.
ठळक मुद्देचुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने जंतूंप्रादूर्भाव होऊन मुलीचा मृत्यू झाल्याचे निष्षन्न