पिंपरी : फ्लॅट खरेदीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर त्याची रक्कम परस्पर घेऊन सून माहेरी निघून गेली. तुला काय करायचे ते कर, पैसे घेण्यासाठी आला तर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी फोनवरून दिली. पुनावळे येथे १३ जानेवारी ते २८ जुलै दरम्यान हा प्रकार घडला.शारदा अशोक नागवाणी (वय ६२, रा. पुनावळे) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची सून हिना अशोक रोरा, तसेच मेनका अशोक रोरा, अशोक रोरा व आशिष अशोक रोरा (सर्व रा. ग्वालीयर, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फ्लॅट घेण्यासाठी सून हिना हिच्याकडे सहा लाख रुपये दिले होते. एका बांधकाम व्यावसायिकाकडे फ्लॅटची नोंदणी करून ती रक्कम जमा केली. मात्र काही कारणास्तव फ्लॅट खरेदीचा व्यवहार रद्द झाला. त्यानंतर सून हिना हिने नोंदणी करताना जमा केलेली रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडून परस्पर घेऊन माहेरी निघून गेली. त्यामुळे फिर्यादी यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र तिने व अन्य आरोपी यांनी संगनमत करून पैसे देण्यास नकार दिला. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी यांना फोन करून पैशांची मागणी केली. आम्ही तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे आरोपी म्हणाले. तू पैसे घेण्यासाठी ग्वालेरला आल्यावर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकीही फोनवरून दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, वाकड पोलीस तपास करीत आहेत.
फ्लॅटचे पैसे परस्पर घेऊन जिवे मारण्याची धमकी; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 6:15 PM