पिंपरी : पिंपरी-चिंचवडस्मार्ट सिटी लिमिटेडकडून शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. या कामांना काही ठिकाणी विरोध होत आहे. या कामास विरोध करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची अकरावी बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झाली. कृष्ण प्रकाश म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये काही ठिकाणी खोडा घातला जात आहे. जाणीवपूर्वक विरोध केल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास येत आहेत. अशा विरोधामुळे कामास विलंब होत आहे. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. जाणीवपूर्वक कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात येतील.ह्ण
कृष्ण प्रकाश, मिसाळ यांची निवडपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची निवड करण्यात आली. माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे आणि माजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी या दोन सदस्यांची निवड करण्यात आली.
पिंपळे सौदागरमध्ये स्मार्ट क्रीडांगण
सायकलिंग आणि स्केटिंगसाठी पिंपळे सौदागर येथील लिनियर उद्यानात बीएमएक्स-प्ले एरियामध्ये अॅडव्हेंचर सायकलिंग व अॅडव्हेंचर स्केटिंग तयार केले जाणार आहे. हे स्मार्ट क्रीडांगण उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.