पिंपरी : एकाच कुटुंबातील तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमित कृष्णाचंद सक्सेना (वय ३७, रा. सॅपरॉन सोसायटी, पिंपळे सौदागर) या व्यवसायातील भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी तोट्यात असल्याने, तसेच भागीदार पसार झाल्याच्या तणावातून आत्महत्येचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी सुधीर पवार (वय ६३), पती सुधीर नथुराम पवार (वय ६९) व मुलगा रोहित सुधीर पवार (वय ३०) यांनी शनिवारी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अश्विनी पवार यांचा मृत्यू झाला, तर पती आणि मुलगा बचावले. तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमित सक्सेना या व्यावसायिक भागीदारावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सक्सेना याने सुधीर पवार यांना शुभंकरोतीप्रा. लि. कंपनीमध्ये २० टक्के भागिदारीमध्ये घेतले होते. परंतु, त्याने कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार स्वत:कडे ठेवून कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेच्या व्यवहाराची माहिती दिली नाही. दरम्यान, कंपनी तोट्यात असल्याबाबत सेबीने नोटीस दिली होती. ती मिळाल्यानंतरही सक्सेना याने गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता व त्यांच्या परताव्याबाबत सुधीर पवार यांना कोणतीही माहिती न देता मोबाइल बंद करून कुटुंबासह पोबारा केला. गुंतवणूकदारांनी पवार यांच्याकडे परताव्याची रक्कम मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर पवार पुन्हा सोमित यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, तो होऊ न शकल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या तणावातून पवार कुटुंबातील तिघांनी राहत्या घरी झोपेच्या गोळ्या खाऊन ब्लेडने हाताच्या नसा कापल्या. यासह शरीरावर चाकूने वार करून घेतले. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये अश्विनी पवार यांचा मृत्यू झाला, तर सुधीर आणि रोहित पवार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
भागीदारावर गुन्हा
By admin | Published: October 24, 2016 1:00 AM