पिंपरी : तडीपार असताना खून करून फरार झालेल्या ससा उर्फ सागर उर्फ दशरथ राजकुमार वाघमोडे (वय २३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला जेरबंद करण्यात यश आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे. आरोपी हा रावण टोळीतील सराईत गुन्हेगार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ससा वाघमोडे हा सराईत गुन्हेगार असल्याने पिंपरी-चिंचवड येथील परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त यांनी त्याच्या तडीपारीचे आदेश दिले होते. मात्र तडीपार असताना आॅक्टोबर २०१९ मध्ये आरोपी ससा याने चिंचवड येथे येऊन खून केला. त्यानंतर तो फरार होता. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे पोलीस सोमवारी (दि. १७) गस्त घालत होते. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ आरोपी ससा कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे, अशी माहिती गस्तीवरील पथकाला मिळाली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास आरोपी ससा याला ताब्यात घेतले. तडीपार असताना पुणे जिल्ह्यात येण्याबाबत परवानगी घेतली आहे काय, अशी विचारणा त्याच्याकडे पोलिसांनी केली. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी ससा वाघमोडे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. निगडी, देहुरोड व चिंचवड पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे असे विविध गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, उमेश पुलगम, आशिष बोटके, निशांत काळे, विक्रांत गायकवाड व सागर शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रावण टोळीतील "ससा’' पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 2:06 PM