पिंपरी : एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात गुंड महाकालीचा जवळचा नातेवाईक असलेल्या संजू दीपक सरसार (वय १९, बोपोडी) याच्यासह सराईत गुंड पंकज ऊर्फ गजनी बाळासाहेब हिंगे (वय २७, रमाबाईनगर, रावेत) या आरोपींना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल, दोन रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसे असा एक लाख २१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. निवडणुकीमुळे गुंडांच्या हालचालींना वेग आला आहे. पिंपरीतील कुख्यात गुंड राकेश फुलचंद ढोलकिया ऊर्फ महाकाली या गुंडाचा २०१० मध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला. महाकालीचा एन्काउंटर झाला, तरी त्याची टोळी अद्यापही सक्रिय आहे. या टोळीतील सदस्य व महाकालीचा जवळचा नातेवाईक संजू सरकार हा बेकायदा शस्त्र घेऊन वावरत असताना एटीएस पथकाला आढळून आला. त्याचा साथीदार पंकज हिंगे यालाही शस्त्रासह पकडले. खडकी बाजारात या दोघांना पकडले. महापालिका निवडणूक कालावधीत गुंडांच्या हालचालींना वेग आला आहे. १५ हून अधिक तडीपार गुंड शहरातच वावरताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोक्का, एमपीडीएतील आरोपींवर ऐन निवडणूक काळात स्थानबद्धतेची कारवाई केली. आणखी २० ते २५ जणांवर कारवाई प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)
शहरातील गुन्हेगार निवडणुकीत सक्रिय
By admin | Published: February 15, 2017 2:17 AM