पिंपरी : निगडीजवळील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाइन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठीच्या जागेसाठी प्राधिकरणाला १६ कोटी ५२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाकडील भूसंपादन निधी या लेखाशीर्षासाठी १५ कोटी ८७ लाखांचीच तरतूद शिल्लक आहे. प्राधिकरण प्रशासनाला हा निधी तत्काळ द्यायचा असल्याने नगररचना विभागातील ‘पुणे महानगर नियोजन’ या लेखाशीर्षामधील एक कोटी रुपये भूसंपादन निधी या लेखाशीर्षकावर वर्ग करण्यात येणार आहे. निगडी ते भोसरी या स्पाइन रस्त्याचे काम त्रिवेणीनगर येथे रखडले आहे. येथील रस्ताबाधितांना पर्यायी जागा दिली जाणार आहे. प्राधिकरणाकडील सेक्टर क्रमांक दोनमधील बल्क लँड क्रमांक एक ते चार येथील १४ हजार ७५४ मीटर चौरस मीटर जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या जागेसाठी प्राधिकरण प्रशासनाने १६ कोटी ५२ लाख ११ हजार रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम अदा केल्यानंतर प्राधिकरणाकडून ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. भूसंपादन निधी या लेखाशीर्षासाठी ४४ कोटी ५१ लाख रुपये इतकी तरतूद केलेली आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक असणाऱ्या भूखंडापोटी प्राधिकरणाला १६ कोटी ५२ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये ६४ लाखांची तरतूद कमी पडत आहे. (प्रतिनिधी)
पुनर्वसनासाठी कोटींची उड्डाणे
By admin | Published: December 13, 2015 11:46 PM