पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मंदिरात अभिषेक, रुद्राभिषेक, शिवलीलामृत पारायण, हरिपाठ, नामस्मरण आदी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरातील तपोवन, धनेश्वर, काळेवाडी, चिंचवड व पिंपळे सौदागर आदी शिवमंदिर भक्तांनी गर्दी केली होती. बहुतांश मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक, रुद्राभिषेक सुरू होते. काही शिवमंदिरांमध्ये शिवलीलामृत अध्याय, पारायण, कीर्तन व अभंग आदी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शिवभक्तांना शिवाच्या दर्शनासोबतच या आध्यात्मिक कार्यक्रमांचा आनंद घेता आला. या वेळी मंदिराच्या परिसराला छाटेखानी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. यामध्ये पूजेचे साहित्य, मूर्ती, धागे व लहान मुलांची खेळणी आदी स्टॉल परिसरात उभारण्यात आले. पिंपरी : भगवान शिव या धरतीवर अवतरीत झालेले आहेत आणि लवकरच भारत देश स्वर्णिम बनणार आहे. त्यामुळे ईश्वराचे नामस्मरण करून त्याच्या मार्गदर्शनाद्वारे जीवन सुखी, शांतीमय बनवा, असा संदेश ब्रह्माकुमारीज पिंपरी सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सुरेखादीदी यांनी दिला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, पिंपरी सेवा केंद्राच्या वतीने आयोजित शिव अवतरण महोत्सवात त्या बोलत होत्या. शुक्रवार (दि. २४) ते रविवार(दि.२६) असे त्रिदिवसीय शिवअवतरण महोत्सव व लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या प्रथमदिनी शुक्रवारी (दि. २४) डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच, १० फूट उंचीचे शिवलिंग दर्शन व आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी लेझर शो पार पडला. तपोवन मंदिर, पवनेश्वर मंदिर, काळेवाडी, देहूरोड, कासारवाडी व पवनानगर येथील शिवमंदिरात आध्यात्मिक चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना शिवसंदेश प्राप्त झाला. (वार्ताहर)
महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी गर्दी
By admin | Published: February 25, 2017 2:20 AM