दिघी : ग्रामदैवत भैरवनाथमहाराज व पीरबाबाच्या उत्सवानिमित्त भैरवनाथ देवस्थान, समस्त गावकरी तरुण मंडळ यांच्या वतीने मनोरंजनाचे कार्यक्रम व निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. कुस्त्यांच्या आखाड्यात महिला पैलवानांच्या महत्त्वपूर्ण लढतीची दंगल बघण्यासाठी दिघीकरांनी गर्दी केली होती. दिघीतील सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या आमिर शहा बाबाच्या संदलने उत्सवाला सुरूवात झाली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा रुद्र अभिषेक व महापूजा करून परिसरातून वाजतगाजत भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली. उत्सवातील तीन दिवसांत महाराष्ट्राची लोकधारा, फुल टू धमाल अशा मनोरंजक कार्यक्रमाने नागरिकांचे मनोरंजन केले. मात्र परिसरात महिला पैलवानांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण लढतीची जास्त चर्चा रंगली होती. उत्सवात आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवाला शांततेत साजरा करण्यासाठी संस्थापक राजेंद्र वाळके, अध्यक्ष प्रवीण वाळके, प्रदीप तुपे, मच्छिन्द्र परांडे, रुपेश डोळस, सूरज वाळके, नितीन परांडे, महेश तापकीर, विकास साकुरे, विनोद वाळके, आकाश वाळके, सूर्यकांत वाळके, किशोर सावंत, विजय परांडे, शिवाजी वाळके, नीलेश वाळके, संदीप वाळके, कैलास तापकीर, समस्त गावकरी तरूण मंडळ यांनी परिश्रम घेतले. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कालावधीमध्ये अनेक उमेदवारांनी येऊन प्रचाराचा मुहूर्त साधला. मोठ्या संख्येने मतदार एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक उमेदवार या ठिकाणी भेट देत होते. उत्सवात अनेक परगावचे नातेवाईक आल्याने राजकीय गप्पा रंगत होत्या.(वार्ताहर)
‘दंगल’ पाहण्यासाठी दिघीत गर्दी
By admin | Published: February 15, 2017 2:00 AM