चिंचवड : उन्हाच्या झळांनी शहरातील वातावरण तापू लागले आहे. यामुळे शहरातील विविध दुकानांमध्ये व आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी वाढत आहे. विविध प्रकारच्या थंडगार आइस्क्रीम, मस्तानी, कुल्फी, मिल्कशेक, सरबत, ज्यूस व फालुदा या थंडगार पदार्थांची मागणी वाढली आहे.वाढत्या गरमीतून बचाव करण्यासाठी नागरिक आइस्क्रीमचा आनंद घेण्यासाठी पार्लरमध्ये जात असल्याचे दिसत आहे. सध्या बाजारातील आइस्क्रीम पार्लरमध्ये विविध प्रकारच्या आइस्क्रीम आल्या आहेत. कॉनेटो, कँडी, चोकोबार, कसाटा, कुल्फी यांना सर्वाधिक मागणी आहे. याचबरोबर विविध प्रकारचे फॅमिली पॅक, कप यांनाही ग्राहक पसंती देत आहेत. पिस्ता, मँगो, बटरस्कॉच, चॉकलेट, केशर, ब्लॅककरंट, राजभोग, व्हॅनिला, रोझ अशा विविध प्रकारचे फ्लेवर ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. याचबरोबर ड्रायफ्रूटच्या आइस्क्रीम ही उपलब्ध आहेत.फळांपासून बनविण्यात येणाऱ्या ज्यूस व आइस्क्रीमला विशेष मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यामध्ये स्ट्रॉबेरी, पेरू, अंजिर, संत्रा-मंत्रा, सीताफळ, चिकू, रासबेरी, मँगो, नारळ या फळांपासून तयार होणारे आइस्क्रीम उपलब्ध आहेत. याचबरोबर मस्तानी या प्रकाराची क्रेझ वाढत आहे. दूध, सिरप, आइस्क्रीम, ड्रायफ्रूट यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या मस्तानीला ग्राहक पसंती देत आहेत. आइस्क्रीम दहा रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत असून कुल्फी दहा ते चाळीस व मस्तानी साठ ते दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सध्या वाढत असणाºया उन्हामुळे ग्राहकांची पावले आइस्क्रीम पार्लरकडे वळत आहेत. दुपारच्या वेळी शुकशुकाट असणाºया आईस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी दिसत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी चांगले दिवस आले आहेत.रोल आइस्क्रीमची क्रेझग्राहकांच्या मागणीनुसार त्वरित आइस्क्रीम बनवून देण्याचा प्रकार आता बाजारात दाखल झाला आहे. मशिनवर विशिष्ट तापमान सेट करून टेबलावर बर्फासारखा भाग तयार केला जातो. अथवा भांडे थंड केले जाते. यामध्ये हवे असणारे फ्लेवर एकत्र करून आइस्क्रीम तयार केले जाते. ग्राहकांच्या समोर याचे रोल तयार करून दिले जातात. समोर उभे राहून आपली मनपसंद आइस्क्रीम बनून घेत आहेत. आइस्क्रीम बनविताना पहावयास मिळत असल्याने या प्रकारच्या आइस्क्रीमची क्रेझ असल्याचे दिसत आहे.
उन्हाच्या झळा वाढल्याने आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:40 AM