पिंपरी : मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बारवर पोलिसांनी छापा टाकला. यात बारमालकासह कर्मचारी व ४६ ग्राहकांवर कारवाई झाली. यात आरोपी बारमालकाकडून सात हजार १०० रुपयांची रोकड जप्त केली. पिंपरी-चिंचवड पाेलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. २८) साई चौक, पिंपरी येथे ही कारवाई केली.
बारमालक राजेश कनैय्या लालवानी (वय ४८), वेटर अराफत मोजरिम मंडल (वय २४), हबीबूल माफीजूल शेख (वय १९), कुक कौसिक अनारुल मुल्ला (वय २१, सर्व रा. पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश लालवानी याच्या मालकीचा साई चौक, पिंपरी येथे सलोनी बार आहे. हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवून ग्राहकांची गर्दी झाली असून त्यामुळे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने रात्री साडेबाराच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये ४६ ग्राहक मिळून आले. त्यांच्यावर कारवाई करून २३ हजारांचा दंड आकारण्यात आला.
सामाजिक सुरक्षा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.