पिंपरी : ‘दम मारो दम’साठी गांजाची झाडे घराबाहेर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. तसेच दोन गांजाची झाडे जप्त केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. ५) दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळे निलख येथे ही कारवाई केली.
धानेश अनिरुद्ध शर्मा (वय ३४, रा. पिंपळे निलख, मूळगाव कोहरालिया, पो. मुसहरीबानार, जि. गोपालगंज, बिहार), असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी मितेश यादव यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानेश शर्मा हा फर्निचरचे काम करतो. कुटुंबासह तो पिंपळे निलख येथे भाडेतत्त्वावर एका चाळीत राहण्यास आहे. चाळीतील त्याच्या राहत्या खोलीसमोर मोकळी जागा आहे. तेथे काही झाडे व झुडपे आहेत. त्यात त्याने गांजाची दोन झाडे लावली. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. धानेश याच्या खोलीसमोरील मोकळ्या जागेतून एक लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची गांजाची दोन झाडे व मोबाइलसह धानेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून धानेश याला अटक करण्यात आली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.