नेहरुनगर : मोरवाडी, अजमेरा, मासूळकर कॉलनी परिसरातील गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई, महल, पौराणिक देखाव्यांसह सजावटीवर भर दिला असून, अनेक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.मोरवाडी येथील नवयुग तरुण मित्र मंडळाच्या वतीने संगीताच्या तालावर आकर्षक विद्युत रोषणाई हा देखावा सादर केला आहे. हेल्मेटचा वापर करा, पाणी वाचवा, मुलगी वाचवा मुलगी जगवा असे सामाजिक संदेश देणारे फ्लेक्स मंडळाने लावले आहेत. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नरहरी कापसे, उपसभापती राजाराम कापसे, सचिव दशरथ जाधव आहेत. मंडळाचे ४९ वे वर्ष आहे.अजमेरा कॉलनी डब्ल्यू सेक्टर येथील तिरंगा मित्र मंडळांच्या वतीने १२-१२ फुटी गणपतीचे आकर्षक मूर्तींची स्थापना केली आहे. मंडळाचे वर्ष ३१ वे असून अध्यक्ष निखिल निकम, उपाध्यक्ष दीपक बुद्धन, कार्याध्यक्ष आकाश जगताप आहेत.शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही आकर्षक मंदिर बनवण्याची परंपरा कायम ठेवली असून, मंडळाने या वर्षी लखनऊ येथील देवीच्या मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. मंडळाचे यंदाचे वर्ष १६ वे असून, मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजप दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले, उपाध्यक्ष गौरव काकडे, कार्याध्यक्ष डेव्हिड मकासरे हे आहेत.मासूळकर कॉलनी येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने यंदा शंकराच्या पौराणिक मंदिराची प्रतिकृती हा देखावा सादर केला असून, मंडळाने यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले असून, वृद्धाश्रमात धान्यवाटप केले आहे. मंडळाचे २८ वे वर्ष असून, अध्यक्ष कौशल रावल, उपाध्यक्ष अमित मेहता, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पालेकर आहेत.शिवप्रेमी तरुण मित्र मंडळाच्या वतीने ‘होळी सण’ हा हलत्या मूर्तींचा पौरोणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे १५ वे वर्ष असून, मंडळाचे अध्यक्ष शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, उपाध्यक्ष अक्षय मोरे, कार्याध्यक्ष विनायक भोसले, खजिनदार चेतन पवार हे आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; सामाजिक, पौराणिक देखाव्यांवर मंडळांनी दिला भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 6:46 AM