कुरकुंभ : येथे बिबट्याच्या अफवेने गेले आठवडाभर नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व शेती आधारित व्यावसायिक धास्तावला आहे. मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्यासदृश प्राणी दिसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.कुरकुंभ गावात बिबट्या दिसला अशी अफवा पसरवली, का खरंच बिबट्या या परिसरात वास्तव्य करीत आहे, याबाबत अजूनपर्यंत काही शाश्वत माहिती मिळाली नाही किंवा बिबट्या नक्की कुणाला दिसला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी अचानक गावात अफवा पसरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे याबाबत वनविभागाने लवकरच चौकशी करून सत्यता समोर आणली पाहिजे अथवा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.कुरकुंभ येथील गिरमेवस्ती, भंडलकरवस्ती, भागवतवस्ती परिसरातील शेतकरी त्यामुळे शेतातील कामे करण्यास जात नाही. परिणामी शेतातील उभी पिके व भाजीपाला अन्य व्यवसायावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, बिबट्या दिसला ही फक्त अफवाच असल्याची चर्चा होत आहे. जर खरंच बिबट्या असल्यास त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, असा खोडसाळपणा करून सामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. बुधवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान बिबट्या गिरमेवस्ती परिसरात असल्याचे कळताच नागरिक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवण्याचे काम चालू केले. यातच एका जनाला बिबट्यासदृश प्राणी दिसल्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. (वार्ताहर)
कुरकुंभला बिबट्यासदृश प्राण्याची दहशत
By admin | Published: January 05, 2017 3:20 AM