पिंपरी : अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व मंगलमूर्ती वाडा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २) अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथे चिंतामणी गणेश मंदिरात दर्शनासाठी तसेच महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी ८० ते ९० हजार भाविक हजेरी लावतात. मंगळवारी देखील अशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांकडून जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री बारापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
...या भागात संचारबंदी, जमावबंदी... चिंचवड गावातील पडवळ आळी, सुखकर्ता अपार्टमेंट चाैक, जिजाऊ पर्यटन केंद्र, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चाैक, मंगलमूर्ती वाडा परिसर, चिंतामणी गणेश मंदिर/मोरया यात्री निवास, मोरया प्रसाद हाॅल समोरील रस्ता, मोरया गोसावी मंदिर परिसरात संचारबंदी व जमावबंदी राहणार आहे.