किवळे : दिवाळीनिमित्त आप्त-मित्रांसह इतरांना काव्यमय शब्दांत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बाजारात निरनिराळ्या प्रकारची शुभेच्छापत्रे उपलब्ध असली, तरी ग्राहकांचा त्याला अगदी अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.स्मार्ट फोनवर फेसबुक, व्हॉट्स अॅप अशा विविध समाज माध्यमांतील ‘स्मार्ट’ भाषेमुळे शुभेच्छा पाठविण्याच्या पद्धती अधिक आधुनिक होत असून, त्यांचे स्वरूप बदलले आहे. परिणामी दिवाळी शुभेच्छापत्रांच्या मागणीला मोठी ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. ठरावीक लोकप्रतिनिधी, राजकारणी, तसेच काही संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सहकारी बँकांचे संचालकवगळता दिवाळी शुभेच्छापत्रे देणाऱ्यांची संख्या घटली आहे.शहरी व निमशहरी भागात गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्रांद्वारे शुभेच्छा देण्याची पद्धत सर्वत्र रूढ होती. त्यामुळे मराठी व इंग्रजी भाषेतील शुभेच्छापत्रांची बाजारात चलती असायची. दिवाळीच्या चार-पाच दिवस अगोदरपासूनटपालाने शुभेच्छापत्रे येत असत. मोठ्या उत्साहाने शुभेच्छापत्रांचे घराघरांत वाचन केले जायचे. मात्र स्मार्ट फोनच्या जमान्यात शुभेच्छापत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. भ्रमणध्वनींवरून पाठविण्यात येणारे संदेश, व्हॉट्स अॅप व फेसबुकसारखा सोशल मीडिया (समाज माध्यम) याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. साधारणपणे पंधरा-वीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतच्या किमतीत ही शुभेच्छापत्रे सध्या ठरावीक दुकानांत उपलब्ध असली, तरी पुरवठा व मागणी यात मोठी तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे.व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी स्मार्ट माध्यमांमुळे शुभेच्छापत्रांना असणारी मागणी खूपच कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बदलत्या काळाबरोबर भावना व्यक्त करण्याची माध्यमे बदलत असल्याने शुभेच्छापत्रांच्या बाबतीत नव्या माध्यमांच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे.दिवाळी शुभेच्छापत्रे खरेदी करण्यासाठी येणाºया ग्राहकांची संख्या अलीकडच्या काळात फारच कमी होत चालली आहे. शिवाय स्मार्ट फोनमुळे हव्या त्या व्यक्तीशी समोरासमोर (व्हॉट्स अॅप कॉल वा व्हिडीओ कॉल) संपर्क होत असल्याने हल्लीच्या तरुणी-तरुणांचा शुभेच्छापत्रे घेण्याकडे कल खूपच कमी झाला आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, काही बँक, व्यावसायिक कार्यालये यांत दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छापत्रे घेतली जात असत. परंतु या वर्षी त्यांच्याकडूनही अजिबात मागणी आली नसल्याचे छपाई व्यावसायिकांनी सांगितले. काही पदाधिकारी वगळता दर वर्षी दिवाळीच्या सणानिमित्त शुभेच्छापत्रांना असणारी मागणी या वर्षी खूप कमी झाली आहे.
शुभेच्छापत्रांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 2:50 AM