पिंपरी : सोशल मीडियावर प्रख्यात व्यक्तींच्या नावे अनेक बनावट अकाऊंट असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कृष्ण प्रकाश यांनी स्वत: माहिती दिली असून अशा पद्धतीने कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा व फोटोचा वापर करून सायबर चोरट्यांनी फेसबुकवर बनावट खाते तयार केले. या बनावट अकाऊंटच्या फ्रेंडलिस्टमधील काही जणांना मेसेज करून ऑनलाइन दहा हजारांची मदत मागितली. याबाबत शंका आल्याने यातील काहींनी कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क केला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
उच्चशिक्षित तसेच सर्वसामान्य नागरिकांना सायबर चोरटे नेहमीच गंडा घालतात. त्यांची ऑनलाइन फसवणूक केली जाते. मात्र, पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्याचे धाडस केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. माझ्या नावाने अज्ञातांनी सोशल मीडियावर काही अकाउंट सुरू केली आहेत. त्यामाध्यमातून पैशांची मागणी केली जात आहे. हा प्रकार गंभीर असून कठोर कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीने कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
....................
नामांकित व्यक्तींच्या नावाने सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्याचे प्रकार होतात. त्यामाध्यमातून फसवणूक केली जाते. मात्र सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांनी सतर्कता बाळगली पाहिजे. अशा प्रकारांना बळी न पडता, पोलिसांना माहिती दिली पाहिजे. माझ्या नावाने तयार केलेले बनावट अकाऊंट फेसबुककडून बंद करण्यात आले आहे.- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड