रहाटणी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपळे सौदागर येथे सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली , या उपक्रमाचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पालिका आयुक्त श्रवण हार्डीकर, महापौर राहुल जाधव ,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार , स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, नगरसेवक नाना काटे,शत्रुघन काटे,नगरसेविका निर्मला कुटे यांच्यासह परिसरातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील सोसायटीमधील नागरीक उपस्थित होते .
परिसरातील वाढती वाहनसंख्या व रस्त्यावर जाणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून महापालिका व एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या पिंपळे सौदागर येथे 50 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ,त्यानंतर सायकलची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही सायकल वापरण्यासाठी 5 रुपये प्रतितास भाडे द्यावे लागणार आहे . सध्या पिंपळे सौदागर परिसर झपाटयाने विकसित होत आहे त्यामुळे येथील लोकसंख्याही त्याच पटीत वाढली आहे .सकाळ संध्याकाळ येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहने दिसून येत आहेत ही वाहन संख्या कमी व्हावी म्हणून सायकल शेअरिंग सेवा सुरू करण्यात आली आहे, मात्र ही सुविधा नोव्हेंबर 2017 मध्ये काही सोसायटी सदस्यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली होती. ही सुविधा एका तासाला 2 रुपये या प्रमाणे सुरू करण्यात आली हाेती. या सेवेला नागरिकांनी काही दिवसच प्रतिसाद दिला ,काही दिवस शेअरिंग सायकली रस्त्यावर दिसल्या मात्र त्या पुन्हा कधी दिसल्याच नाहीत. अाता हाच उपक्रम महापालिका प्रशासनाने सुरू केल्याने याचे नेमके काय होणार हा खरा प्रश्न आहे.