पिंपरी : देशभरातील संरक्षण विभागाशी, संबंधित सर्व दारुगोळा कारखाने पूर्णत: चालू ठेवण्याचा सरकारचा मानस असून कोणतीही कामगार कपात केली जाणार नाही. दारूगोळा कारखान्यात अत्याधुनिकीकरण करण्यात येत असून, आवश्यक यंत्रसामग्री करार झालेला देशातून संबंधित व्हेंडरकडून खरेदी केली जाते़ खरेदी आवश्यकतेनुसार केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिले, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. सरंक्षणविषयक सामग्री निर्माण करण्याची क्षमता दारूगोळा कारखान्यामध्ये आहे़ ही क्षमता असूनही सरकारच्या वतीने शासकीय कारखान्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाखासदार बारणे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचे ४१ दारुगोळा, आयुध निर्मिती कारखाने आहेत. ते संरक्षण विभागाच्या तिन्ही दलासाठी उत्पादन करीत असून सध्या कामगार कपात केली जात आहे. ६० टक्के माल हा बाहेरील कंपन्यांकडून आयात केला जातो. उत्पादन क्षमता अजूनही सरकारच्या या कारखान्यांकडे दुर्लक्ष केले जाते. खडकी येथील दारूगोळा कारखान्याला संरक्षण विभागाच्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून कमिटी समवेत भेट दिली असता खडकी अॅम्युनिशन फॅक्टरीची क्षमता असूनही उत्पादन केले जात नाही, ही बाब निदर्शनास आली. मेक इन इंडियाला महत्त्व न देता विदेशी कंपनीकडून अधिक सामग्री मागवली जाते. मेक इन इंडियाप्रमाणे मेड इन इंडियालाही प्रोत्साहन दिल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल व उत्पादन क्षमता वाढेल.’’
दारूगोळा कारखान्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:21 AM