पिंपरी : तरतुदी वर्गीकरणाच्या मुद्यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडले. वर्गीकरणाचे विषय सभेच्या विषय पत्रिकेवर न आणण्याची घाई कशासाठी? ही दादागिरी आहे, वर्गीकरणावरून राष्टÑवादीच्या कालखंडात ज्यांनी टीका केली. तेच भाजपाचे लोक सत्तेत आल्यानंतर चुकीचे निर्णय घेत आहेत, अशी टीका विरोधीपक्षाने केली आहे. तर अखर्चित रकमेचे वर्गीकरणाचे प्रस्ताव आहेत़ कोणत्याही प्रभागाचा किंवा नगरसेवकांचा निधी पळविलेला नाही, असा खुलासा सत्ताधाऱ्यांनी केला. दादागिरी आणि रिंग वरून सत्ताधाºयांना लक्ष्य केले होते.महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव आयत्यावेळी सभेसमोर आणले जाणार होते. सभेच्या सुरुवातीला नगरसचिव उल्हास जगताप यांनी वन के खाली वर्गीकरणाचे ठराव दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या वेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. आजच्या सभेत या विषयावर चर्चा होणार नसेल, तर विषय दाखल करून घेऊ नयेत, अशी मागणी केली.‘‘महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच २६५ कोटी रुपयांचे वर्गीकरण केले जात आहे. वर्गीकरण करावे लागणे म्हणजे सत्ताधाºयांची अकुशलता आहे, की प्रशासनाची निष्क्रियता आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. अपयश झाकण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. सत्ताधाºयांपैकी चार नगरसेवकांनी हे वर्गीकरणाचे प्रस्ताव नियोजन करून आणले आहेत. ही सभा काही शेवटची नाही. त्यामुळे आयत्यावेळी विषय दाखल करून घेऊ नयेत. सत्ताधाºयांनी लोकशाहीचा गळा न घोटता, रीतसर विषय आणावा. विषयपत्रिकेवर विषय येऊ द्या, महापौर बदलाचे वारे सुरू आहे. मलिदा खायचे दुसरेच आणि तुमच्यावर खापर फोडायचे.त्यामुळे महापौरांनी आपल्याडोक्यावर खापर फोडून घेऊ नये़ तसेच राष्ट्रवादी सत्तेत असताना उपसूचनांवरून विरोधकांनी टीका केली. उपसूचनांतून भ्रष्टाचार होतो, अशी टीका केली होती. मग आता तुम्ही करता ते काय आहे. कितीही विषय आणायचे त्यांनी आणावेत ते विषय पत्रिकेवरून आणावेत, असा जोरदार हल्ला योगेश बहल यांनी केला. त्यावर भाजपाचे विलास मडिगेरी यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘वर्गीकरणाचे विषय हे अखर्चित रकमेचे आहेत़ त्यामुळे कोणाच्या प्रभागातून किंवा नगरसेवकांचा निधी पळविलेला नाही. तसे आढळल्यास राजीनामा देऊ.’’सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘टीका करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. या सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जात नाही आणि कोणतीही दादागिरी नाही.’’>विषय दाखल करून घेतले आहेत. कोणते विषय दाखल करून घेतले आहेत त्याची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात येईल. या विषयांना विरोधक महासभेत विरोध करू शकतात.- नितीन काळजे, महापौर>वर्गीकरणाचे विषय सर्वसाधारण सभेसमोर आयत्यावेळी आणण्याची कोणतीही गरज नाही. रीतसर विषय आणा. कुठले पैसे वळविले आहेत. याची नगरसेवकांना माहिती मिळाली पाहिजे. सध्या भाजपाची दादागिरी वाढली आहे. दादागिरी आणि बहुमताच्या जोरावर विषय दाखल करून घेऊ नका. आणि घ्यायचा असेल तर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचा विरोध नोंदवून दाखल करून घ्यावा.- दत्ता साने, विरोधी पक्षनेते>डीपी डेव्हेलपमेंटमधील निधीबाबत विषय आहेत. ही कामे कोणत्या प्रभागातील आहेत, याची नगरसेवकांना माहिती मिळायला हवी. वर्गीकरणाचे अधिकार यापूर्वी स्थायी समितीला होते. परंतु, योगेश बहल न्यायायलात गेल्यामुळे मंजुरीचे अधिकार सर्वसाधारण सभेकडे आले आहेत. खर्च हा सर्व प्रभागांसाठी समान करायला हवा. समान न्याय मिळत नसतील तर विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.- सीमा सावळेसभा तहकूब करण्याचा विक्रम सुरू आहे. वारंवार सभा तहकूब करणे योग्य नाही. एकेकाळी टीका करणारे सत्तेत आल्यानंतर अनुकरण करीत आहेत. आयुक्त नाही हे कारण सबळ नाही. विषयाचे वाचन करावे, कोणत्या भागासाठी निधी वर्ग होणार आहे. याची माहिती द्यावी.- अजित गव्हाणे
दादागिरीवरून कोंडी, अखर्चित रकमेच्या वर्गीकरण प्रस्तावावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:26 AM