देहूरोड : पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ -मुळशीसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे दोन लाख आंबेडकर अनुयायांनी येथील ऐतिहासिक धम्मभूमीतील बुद्धमूर्ती, तसेच डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिस्तूपाचे मनोभावे दर्शन घेतले. विविध राजकीय पक्ष व संघटनेच्या अनेक मान्यवरांनीही बुद्धमूर्तीचे दर्शन घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. येथील बुद्धविहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वहस्ते केली होती. या ऐतिहासिक घटनेला रविवारी ६२ वर्षे पूर्ण झाली. थंडीतही सकाळपासून मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे मैदान, कॅन्टोन्मेंट रुग्णालय, बाजारपेठ परिसर अनुयायांनी गजबजला होता. रांग दुपारी महामार्गाच्या समांतर दिशेने लांबपर्यंत गेली होती. तरुणांचे जथ्थे रॅलीद्वारे धम्मभूमीकडे जात होते. काहींनी दुचाकी रॅली काढली होती. बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा, रायसिंग धम्मचक्र ग्रुप, सोशल एजुकेशन व मूव्हमेंट पुणे, बहुजन मुक्ती पार्टी, आरपीआय आठवले गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युवारत्न सेवा समिती, तसेच सामाजिक संघटना व व्यक्तींच्या वतीने धार्मिक कार्यक्रम, भीमगीते गायन, शिक्षण व करियर मार्गदर्शन, प्रबोधन सभा तसेच अन्नदान आदींचे आयोजन केले होते. समता सैनिक दलाने पथनाट्य सादर केले.(वार्ताहर)
देहूरोड धम्मभूमीवर दर्शनासाठी जनसागर
By admin | Published: December 26, 2016 2:56 AM